माझी गच्चीवरील शेती

 माझी गच्चीवरील शेती

    आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. आपली व देशाची प्रगती करण्याची धडपड चालू असते यासाठी औद्योगीक प्रगती गरजेची असते व ही करताना आपल्या भोवताली असणाऱ्या भौगोलिक परिस्थिती मध्ये बदल करावा लागतो. याचा अर्थ निसर्गामध्ये जे निर्माण झालेले आहे. जे आपणास निसर्गाने दिले आहे ते नष्ट करावे लागते. उदा. अनेक कारणासाठी झाडे तोडणे, खडी व दगड मिळवण्यासाठी डोंगर फोडणे, पाण्यासाठी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल करणे किंवा जमिनीत बोर व विहिरी मारणे, अशा अनेक गोष्टी मानुस आपल्या प्रगतीसाठी निसर्गाच्या विविध गोष्टींचा ऱ्हास करत असतो. यातील काही गोष्टी करणे मानसाची गरज असते तर काही गोष्टीसाठी तो पर्यायाचा वापर करून टाळू शकतो पण तो तसे करत नाही. 

 मग पुढे असा प्रश्न आहे, मानसाने प्रगती करायची की नाही. 

  •  शेतीसाठी जमिनी मिळवण्यासाठी झाडे तोडणे, पाण्यासाठी धरणे बांधणे, बोर मारणे, विहिरी खोदणे, 
  • रस्ते तयार करण्यासाठी डोंगर फोडावे लागतात, झाडे तोडावी लागतात.    
  • शहर वसवण्यासाठी शेती व जंगले ही नष्ट करावी लागतात.
  • अनेक खनिजे मिळवण्यासाठी पृथ्वीच्या गर्भात खोदकाम करावे लागते.

या गोष्टी मानसच्या प्रगतीसाठी गरजेच्या आहेत मग त्या करावयाची नाही त्या योग्य की अयोग्य या गोष्टी मध्ये मी पडणार नाही. कारण या सर्व गोष्टीवर खुप उलट सुलट चर्चा होवू शकते.  मी येथे थोड वेगळ्याचे गोष्टीची चर्चा करणार आहे.

 मी ही वरील प्रमाणे माझे घर बांधण्यासाठी पिकावू शेतीचा दिड गुंट्याचे क्षेत्र वापरले, म्हणजे या दिड गुंट्यातील शेतीचे उत्पन्न बंद झाले. मग मी विचार केला की जर मला स्वतःच्या घरात रहावयाचे असेल तर मला ही जागा वापरणे गरजेचे आहे. मग मी या शेतीच्या उत्पन्नाचा कमीत कमी पन्नास टक्के तरी उत्पन्न मी या जागेतून मिळवले पाहीजे असा विचार करून मी गच्चीवर बाग करण्याचे ठरवले. त्यामुळे बांधकाम करतानाच त्यासाठी स्लॅपवर चारी बाजूस पाच फुटावर दिड फुट उंचीचे बांधकाम करून आतमध्ये वॉटरफ्रुफींग करून घेतले. आता प्रश्न होता मातीचा, गच्चीवर माती वापरुन शेती करावयची म्हणजे स्लॅपला मातीचे वजन कमी पाहीजे म्हणजे माती हलकी पाहीजे यावर उपाय म्हणजे कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करून हल्लकी माती तयार करणे. त्यासाठी घराती कचरा तसेच आजूबाजूचा झाडपाल्याचा कचरा गोळा करणे सुरू केले. व त्या पासून माती तयार करणे सुरू केले. पण यापासून जवळ जवळ पाचशे स्क्वेर फुटचा बेड तयार करण्यास खुप वेळ लागणार म्हणून थोडी माती वापरण्याचे ठरवले. बांधकाम करताना कॉलमसाठी खड्डे काढताना जी माती निघाली त्याच मातीचा वापर करून बेड केले. व त्या मध्ये भाजीपाला लावण्यास सुरवात केली. 

हळू हळू कचऱ्यापासून तयार होणाऱ्या मातीचे प्रमाण वाढू लागले. त्याच बरोबर नवीन नवीन प्रयोगही करण्यास सुरवात केली. सर्व प्रकारचा भाजीपाल मिळवण्यासाठी तयार केलेल्या बेडची जागा कमी पडत होती म्हणून वेगवेगळ्या प्लॉस्टीक, पत्राच्या डब्बे वापरण्यास सुरुवात केली. तसेच जुन्या मोकळ्या बॅटल्या मिळवल्या त्यातून रोपे लावली. आशा विविध गोष्टीतून माझी बाग गेली १३ वर्ष फुलू लागली आहे. विविध प्रयोग व त्यातून बरेच अनुभव मिळाले ते सर्व अनुभव म्हणजे गच्चीवरील बाग फुलवण्याच्या टिप्स् लेखन स्वरूपात एकत्र करण्याचा पुढे प्रयत्न केला आहे. 

या १३ वर्षाच्या अनुभवातून गच्चीवरली बाग का करावयाची त्याचे फायदे काय या विषयी विचार करता अनेक गोष्टी समोर आल्या. त्यातील काही गोष्टींचा मी वरती उल्लेख केला आहेच. 

सर्वात प्रथम मनाला आनंद मिळवण्यासाठी - प्रत्येक स्वतःची व कुटूंबाच्या उपजीविकेसाठी विविध व्यवसाय करीत असतो. दिवस भरकाम करून घरी आल्यानंतर काही तरी विरंगुळा हवा असतो. त्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी शोधते, कोणी टिव्ही पहाणे, गाणी एकणे, एखादया मित्राकडे जावून गप्पा मारणे, काहीतर एक दोन पेक रिजवून चिडीचिप्प पडतात तर काही जन वायफळ बडबड करतात. या सर्वातून अनेक जण दिवस भराच्या कामातून आपल्याला शिणवटा घालवतात पण या सर्वापेक्षा गच्चीवरील बागेचा पर्याय उत्तम आहे. 

बाग फुलवताना आपण निसर्गाच्या सानिद्यात असतो त्यामुळे मन शांत व आनंदी होते व आपला थकवा जातो. ही झाली एक गोष्ट, दुसरी गोष्ट बागेत काम करताना आपण गाणी ऐकु शकतो त्यामुळे बागकाम बरोबर गाण्याची हौस पण आपली पूर्ण होते. तसेच सकाळ संध्याकाळ आर्धा तास जरी बागेत विविध कामे केली तरी मॉर्निगवॉकला जाण्याची गरज नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. तुमचे शरीर एकदम तंदुरुस्त राहील. हे सर्व फायदे वैयक्तिक झाले. गच्चीवरील बागेचा तुमच्या कुटुंबासाठी खूप मोठा फायदा होतो. आज कालच्या मार्केटमधील भाजीपाल्याचा विचार केला तर रासायनिक पदार्थ व आरोग्यस हानिकारक कीटकनाशकाचा भरपूर वापर केलेला भाजीपाला बाजारात येतो. मोठ्या शहरांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे त्या तुलनेने छोटी शहर आणि ग्रामीण भागात याचे प्रमाण खूप कमी आहे. गच्चीवरील बाग याचा उपयोग करून आपण आरोग्यास लाभदायक होणाऱ्या भाजीपाल्याचे उत्पादन करू शकतो. यातून आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. तसेच आपल्या कष्टातून पिकलेल्या भाजीपाल्याचा वापर करून तयार केलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्याचा आनंद खूपच वेगळा, तो शब्दात व्यक्त करता येत नाही. तसेच यातून आपण आपल्या पुढच्या पिढीला निसर्गाच्या महत्वाचे बाळकडू देऊ शकतो. गच्चीवरील बागेचा आणखीन एक मोठा फायदा आहे की,आपण निसर्गाच्या खूप जवळ जाऊ शकतो. मार्केटमध्ये जो भाजीपाला येतो तोच आपण खरेदी करतो. पण आपण विविध प्रकारचा भाजीपाला आपल्या गच्चीवर लावू शकतो. 

त्यामुळे माहिती नसणारे आणि कधीही आपल्याला तसेच आपल्या पुढच्या पिढीला बऱ्याच गोष्टींचे प्रात्यक्षिकाच्या या माध्यमातून शिकवू  शकतो. उदाहरणार्थ मुलांनी कोबी गड्डा मार्केटमध्ये पाहिलेला असतो,  तो पण तो झाडाला कशाप्रकारे तयार होतो याचे ज्ञान त्याला नसते. आपण आपल्या गच्चीवरील बागेत लावल्या नंतर हळूहळू कसा गड्डा तयार होतो हे त्याला पाहायला मिळत. अशा एक ना अनेक गोष्टी ज्ञान त्यांना देऊ शकतो म्हणून इतर कोणत्याही ही विरंगुळा पेक्षा गच्चीवरील बागेतील विरंगुळा खूप फायदेशीर आहे.

       दुसरा फायदा म्हणजे किचन वेस्ट व त्याचे व्यवस्थापन आपल्याकडे किचन वेस्ट व्यवस्थापन करण्यास खूप अडचणी येतात. वेळेवर घंटागाडी नाही आली, किंवा घंटागाडी नसेलच तर किचन वेस्टचे व्यवस्थापन करणे कठीण जाते. गच्चीवरील बागेत आपण या किचन वेस्टच व्यवस्थापन करून चांगल्या प्रकारचा कंपोस्ट खत तयार करू शकतो. या शेंद्रिय खताचा वापर आपल्या गच्चीवरील बागेत करून चांगल्या प्रकारचा भाजीपाला  पिकवू शकतो. हा एक मोठा फायदा यातून होतो.

     अशा विविध गोष्टीसाठी आपण गच्चीवरील बाग किंवा परसबागेसाठी आपला वेळ काढावा

माझ्या बागेतील काही प्रयोग मी इथे मांडत आहे.

माझी जागा तशी थोडी साडेसातशे स्क्वेअर फुटाची माझी गच्ची. त्यामध्ये अडीचशे स्क्वेअर फुट हे शेड आणि जिन्याची टोपीयामध्ये गेले. पाचशे स्क्वेअर फुट मला बागेसाठी जागा मिळाली. त्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला, फळझाड लावण्यासाठी त्या मानाने ही जागा खूपच कमी,  मग मी वर्टीकल गार्डन चा पर्याय निवडला. त्यामध्ये पहिल्यांदा एक लिटर, दोन लिटर पाण्याच्या बाटल्यांचा वापर करायचे ठरवले. या बाटल्या विशिष्ट प्रकारे एका खाली एक एकमेकाला जोडून चार ते पाच बाटल्यांची एक माळ तयार केली. अशा ६० ते ७० माळा तयार केल्या व  या लटकवण्यासाठी प्रथमता मी बांबूचे शेड तयार केले पण पावसाने आणि वादळामुळे ते एक-दोनदा पडले म्हणून मी पुन्हा लोखंडी स्क्वेअर पाईप चे संपूर्ण शेड तयार केले व त्याला या माळा लटकवल्या. या बाटल्यामध्ये कोकोपीट, माती व कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत यांचे मिश्रण करून भरल्या व यामध्ये घेवडा, कांद्याची पात अशी रोपे लावली. यामुळे मला दोनशे ते अडीचशे रोपे लावता आली. यापासून मला कांद्याची पात व घेवड्याच्या शेंगा बऱ्यापैकी मिळाल्या.

त्यानंतर दुसरा पर्याय निवडला तो म्हणजे हँगिंग गार्डन यामध्ये गोळ्या, चॉकलेट च्या एक किलो, दीड किलोच्या बरण्यांचा वापर केला. या बरण्या प्याराफिटच्या चारी बाजूच्या शेडची जी पाईप फिरली होती त्याला अडकवल्या या सर्वसाधारण दोनशे ते सव्वादोनशे आहे. वरील प्रमाणेच मिश्रण वापरले आहे. यामध्ये बीन्स व जास्त करून स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. पावसाळा संपता संपता स्ट्रॉबेरी सुरू होते ती जवळजवळ मार्च एप्रिल पर्यंत चालते. रोज दोन चार तर कधी कधी पाच सहा स्ट्रॉबेरी मिळतात व त्याही कोणत्याही रासायनिक औषधा शिवाय.

आता नंबर आला तो चारी बाजूंचा पॅराफिट हा पॅराफिट नऊ इंच रुंदीचा असल्यामुळे त्याच्यावर कुंड्या ठेवण्याचा विचार केला. पण प्लास्टिकच्या किंवा मातीच्या कुंड्या आणण्यापेक्षा जुन्या बॅटऱ्या तसेच थर्माकोलचे खोके, तेलाचे डबे अशा सगळ्या टाकाऊ वस्तूंचा वापर केला.  त्यामध्ये वरील प्रमाणेच मिश्रण भरून मिरची, कोबी, फ्लावर, वांगी अशा प्रकारची रोपे लावली तसेच काही डब्यामध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू इत्यादी पालेभाज्यांची लागवड केली. अशा प्रकारे सर्व  पॅराफिट भरला. चारी बाजू पूर्ण झाल्या. 

आत्ता नंबर होता तो स्लॅबचा मी जे  पॅराफिट पासून पाच फूट जागा सोडून १.५ फूट उंचीचे बांधकाम करून घेतले होते व त्यामध्ये प्रथम प्लास्टिकचा कागद टाकला. त्यावर विटा चे तुकडे वाळू याचा एक  थर त्यानंतर त्याच्यावर नारळाच्या फांद्याचे तुकडे तसेच  जे कुजण्यासाठी जास्त वेळ लागेल असे सर्व जैविक पदार्थ त्याच्यावर पसरले त्याच्यानंतर कचरा पाला पाचोळा टाकून एक बेड तयार करून त्यावर थोडीशी माती पसरून व काही दिवस त्याच्यावर पाणी मारले काही दिवसांनी बऱ्यापैकी या सर्व थराचे पण कंपोस्ट तयार झाले व त्याच्यामध्ये भाजीपाला कोबी फ्लॉवर त्याचे रोप लावायला सुरुवात केली. अशा प्रकारे माझ्या बागेचा आवाका वाढला. 

मला अजून थोडी बाग वाढवायची होती पण जागा कमी होते मग एक कल्पना सुचली पॅराफीट पासून जे  पाच फुटावर बांधकाम केले होते त्याची जाडी ही ६ इंच  होती. त्याचा वापर कुंड्या ठेवायसाठी करावा असा विचार केला. कुंड्या पेक्षा लोखंडी पट्टी पासून एक फूट रुंदीचे व तीन फूट लांबीचे व एक फूट खोलीचे असे बॉक्स करून घेतले व त्याला फ्लेक्स लावले आणि असे बॉक्स त्या बांधकामावर ठेवले तर त्याच्यामध्ये सुद्धा नेहमी जशी कुंड्या भरतो तसे ते बॉक्स भरले त्यामध्ये मुळा, टोमॅटो, वांगी यांची  रोपे लावली आता माझ्या बागेचा आवाका अजून वाढला, तर सर्व या बागेला पाणी देणास खूप वेळ लागत होता. म्हणून या सर्व बाजूला ठिबक सिंचन पद्धती केली त्यामुळे पाणी देण्याचा वेळ वाचाला. 

अशा प्रकारे माझी बाग मला माझ्या कुटुंबाला ताजा व विषमुक्त भाजीपाला देऊ लागली तर माझी शेतीची हौस पण पूर्ण केली. आपणही जागा नसल्याचे कारण  न पुढे करता आपल्या टेरेसवर गच्चीवर आपल्या कुटुंबासाठी थोडा विषमुक्त भाजीपाला पिकवू शकतो माझ्या या लेखातून एखाद्याला जरी प्रोत्साहन मिळाले तरी माझ्या या लेखाचे सार्थक झालं असेच मी समजतो. पुढच्या लेखामध्ये या बागेत झालेले बदल, तसेच कोण कोणत्या प्रकारचे खत औषध वापरतो, त्याचे मला आलेले अनुभव हे लिहीन. 

 धन्यवाद


No comments

माझी गच्चीवरील शेती

  माझी गच्चीवरील शेती      आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा द...